वाघोली | प्रतिनिधी : राधेश्वरीनगर, वाघोली परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीगुरुदेव दत्त मंदिर तसेच राधेश्वरी मंदिर, बकोरी रोड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवानिमित्त ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १० या वेळेत श्रीकृष्ण जन्मकथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रात्री १० ते १२ वाजेपर्यंत भजनसंध्या पार पडली. मध्यरात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी अभिषेक पूजा, पाळणा, आरती आणि प्रसादवाटप करण्यात आले. श्रीकृष्णाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्साहात दहीहंडीचा आनंद लुटला.
या संपूर्ण उत्सवाचे नियोजन व आयोजन समस्त ग्रामस्थ राधेश्वरीनगर, वाघोली यांच्या वतीने करण्यात आले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्वांच्या सहकार्याने उत्सव उत्साहात पार पडला.श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या माध्यमातून भक्ती, सामाजिक एकोपा आणि सामूहिक सहभागाचा संदेश देण्यात आला. उत्सवाच्या यशस्वी आयोजनातून राधेश्वरीनगर परिसरातील नागरिकांची एकजूट आणि समाजहिताची भावना अधोरेखित झाली. “एकजुटीने साजरा केलेला उत्सव हीच समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
















