बाणेरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली; रस्त्यावर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

बाणेर : बाणेर परिसरातील महामार्गालगत असलेल्या बिटवाई चौक येथे पुणे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा मोठा फवारा महामार्गासह सर्विस रस्त्यावर उडत होता. या घटनेमुळे बिटवाई चौक परिसरात वाहनचालकांची, विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. एमएनजीएलच्या लाईनचे खोदकाम सुरू असताना या पाण्याच्या लाईन फुटली यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, पाण्याच्या प्रवाहामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्य जलवाहिनी फुटल्याने बाणेर-बालेवाडी, महाळुंगे आणि सुस परिसराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग बंद करण्यात आले आहे. जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वापरताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. एमएनजीएल मुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या लाईन व ड्रेनेज लाईन यांचे नुकसान होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे होत असलेले खोदकाम यामुळे रस्त्याच्या मधील जलवाहिनी व ड्रेनेज लाईन्स अनेकदा फोडल्या जात असून लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होत आहे.

पाण्याची लाईन फुटण्याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी तसेच 24बाय सेव्हन अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामांच्या गुणवत्तेची देखील तपासणी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

See also  आरक्षणामुळे धायरी शिवणेसह ११ गावांतील शेतकरी भुमिहीन : हवेली कृती समिती आक्रमक