पाषाण : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देत पाषाण-सुतारवाडी परिसरातील शिवराय मित्र मंडळ (सुतारवाडीचा राजा) यांनी यंदा अनोखा उपक्रम राबविला. मंडळाच्या वतीने परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना श्री गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला.
गणेशोत्सवात नगरसेवक, आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आरतीसाठी आमंत्रित करण्याची परंपरा आहे. मात्र, समाजाच्या स्वच्छतेसाठी दररोज प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना गणरायाची आरती करण्याचा मान देत शिवराय मित्र मंडळाने सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला.
या उपक्रमातून प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि समाजातील सर्व घटकांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश देण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी मधुभाऊ रणपिसे, दिलीपभाऊ रणपिसे, कैलास रणपिसे, प्रमोद रणपिसे, समीर उत्तरकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















