खडकवासला : ऐतिहासिक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा सिंहगड (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या कारभाराची आणि मागील पाच वर्षांत झालेल्या विविध विकासकामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नागरिक सूर्यकांत सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच माहितीच्या अधिकारातून माहिती मागूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येत्या २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सांबरे यांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२ ते २०२६ या कालावधीत घेरा सिंहगड ग्रामपंचायतीकडे विकासकामांसाठी तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चामध्ये आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून करण्यात आलेल्या खर्चात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच तसेच जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली असल्याचे सांबरे यांनी सांगितले. तसेच माहितीच्या अधिकारातून विकासकामे, निधी, खर्च आणि विविध आर्थिक व्यवहारांबाबत कागदपत्रे व माहिती मागविण्यात आली होती. मात्र, गेल्या चार-पाच महिन्यांपासून अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती मागितल्यानंतर संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा दावाही सांबरे यांनी केला आहे.विकासाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांमध्ये तसेच ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध निधीच्या वापराबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे. संबंधित आर्थिक व्यवहार, विकासकामांची बिले, मंजुरी, प्रत्यक्ष कामांची स्थिती आणि निधीचा वापर यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने आपण उद्विग्न झालो असून, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूर्यकांत सांबरे यांनी सांगितले.
















