रत्नागिरीतील कातळशिल्प माहितीपटावरून वाद; १४.५० कोटी खर्चावर प्रश्नचिन्ह

पुणे : महाराष्ट्र शासनाकडून रत्नागिरी विभागातील ऐतिहासिक कातळशिल्पांवर माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी विरोधकांनी या खर्चावर गंभीर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की, “सिनेमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचा माहितीपट जास्तीत जास्त ५० लाख रुपयांत तयार होऊ शकतो, मग १४.५० कोटी खर्च करण्यामागे नेमका हेतू काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच राज्यात आर्थिक अडचणींचा दाखला देत शाळा बंद करण्याचे निर्णय घेतले जात आहेत, आणि दुसरीकडे अशा प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे का? असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच, कातळशिल्पांवरील माहितीपट तयार करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित केली असती, तर कमी खर्चात अधिक दर्जेदार आणि विविध माहितीपट उपलब्ध झाले असते, असे मतही माने यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या प्रकरणावरून सरकारमधील संभाव्य भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली असून, पारदर्शकता राखून या खर्चाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही पुढे येत आहे. एकीकडे पर्यटन विकासाचा मुद्दा, तर दुसरीकडे खर्चातील पारदर्शकतेवर प्रश्न—या दोन्हींच्या कात्रीत हा प्रकल्प सध्या अडकला असून, यावर सरकारची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  मनसे उमेदवार किशोर शिंदे यांचा सकाळी उद्यानांमध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठींवर भर