माहितीचा अधिकार म्हणजे लोकशाहीची ताकद: भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

पुणे : भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे येथे माहितीचा अधिकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ या विषयावर प्रसिद्ध वकील श्री. महेंद्र दलालकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

यावेळी श्री. महेंद्र दलालकर यांनी माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नसून नागरिकांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनाला चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून आवश्यक माहिती मिळविण्याचा अधिकार या कायद्याने दिला असून त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहण्याबरोबरच कायद्याचा समाजहितासाठी सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. दलालकर यांनी माहिती अधिकाराचा अर्ज करण्याची प्रक्रिया, मागविता येणारी माहिती आणि कायद्याच्या विविध तरतुदी विद्यार्थ्यांना सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. त्यांच्या संवादात्मक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे व्यावहारिक महत्त्व अधिक स्पष्टपणे समजले.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ऋषीकेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा महत्त्वपूर्ण कायदा असल्याचे सांगितले. “जागरूक विद्यार्थीच पुढे जाऊन जागरूक आणि जबाबदार नागरिक घडवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबतच कायदे, अधिकार आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

उपप्राचार्य श्री. अमित पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली फाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. उपमन्यू बंगाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. माहितीच्या अधिकारातून जागरूकता, जागरूकतेतून उत्तरदायित्व आणि उत्तरदायित्वातून सक्षम समाज निर्माण होतो, हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  सिंगापूरला निघाले 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा ...श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; सिंगापूरमध्ये साजरा होणार पाच दिवसांचा गणेशोत्सव