कोथरूड येथील जयराम सहकारी गृह रचना सोसायटीच्या एसआरए प्रकल्पातील गैरसोयींवर रहिवासी आक्रमक; एसआरए आयुक्तांकडून पाहणीची मागणी

कोथरूड : कोथरूडमधील जयराम सहकारी गृह रचना संस्थेच्या एसआरए पुनर्वसन प्रकल्पातील विविध गैरसोयींविरोधात रहिवाशांनी आवाज उठवला आहे. गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) झालेल्या संस्थेच्या बैठकीत सभासद आणि महिला कार्यकर्त्यांनी प्रकल्पातील समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील आणि त्यापुढील मजल्यांवर पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. इमारतीत ठिकठिकाणी कचरा साचणे, स्लॅबमधून पाणी गळती होणे, तसेच १२ क्रमांकाच्या इमारतीत रहिवाशांच्या स्थलांतरावेळी लिफ्ट बंद पडल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. काही रहिवाशांवर इच्छा नसतानाही करारनामे करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

या प्रकल्पाची एसआरए आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यासाठी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात निवेदन देण्याचे नियोजन आहे.

बैठकीत संगीता भोसले, योगिता तोंडे, शालन पासलकर, सीमा जावळकर यांच्यासह महिलांनी मोर्चा काढण्याची मागणी केली. त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीला प्रफुल शिंदे, गणेश सोनार, ॲड. विनोद शिवणकर, राहुल वहाळे, मधुकर जाधव, अभिजित मोरे, विसपुतेकाका, पै. सागर हुलावळे, शंकरभाऊ ठाकरे तसेच शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ऑलिंपिक विजेता खेळाडू स्वप्नील कुसळे व प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी यांची उपस्थिती