बालेवाडी वेलफेअर फेडरेशनच्या मोफत वैद्यकीय शिबिराला ३०० नागरिकांचा प्रतिसाद

बाणेर-बालेवाडी : बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि लायन्स क्लब, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील सुमारे ३०० महिला व पुरुषांनी विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला.

शिबिरात डोळे व दृष्टी तपासणी, मधुमेह, रक्ताच्या विविध चाचण्या, दंत चिकित्सा, रक्तदाब, स्तनाचा कर्करोग तपासणी तसेच बीएमआय यांसह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. सोसायट्यांमधील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा कर्मचारी, छोटे दुकानदार आणि बांधकाम मजूर अशा विविध घटकांनी शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शिबिराचे उद्घाटन गणपतराव बालवडकर यांच्या हस्ते झाले. पुणे महापालिका औंध वॉर्ड कार्यालयाचे सहायक आयुक्त दांगट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी लायन्स क्लबचे प्रांत प्रमुख श्रेयश दीक्षित यांनी सामाजिक कार्यात लायन्स क्लब नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने पुढील उपक्रम सुचवावेत, त्यासाठी लायन्स क्लबकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

गणपतराव बालवडकर यांनी दोन्ही सामाजिक संस्थांच्या कार्याचे कौतुक केले. सहायक आयुक्त दांगट यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना भविष्यात पुणे महापालिकेतर्फेही आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी स्वागत केले, तर सचिव आशिष कोटमकर यांनी पुणे महापालिका, लायन्स क्लबचे पदाधिकारी, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी तसेच नागरिकांचे आभार मानले. अशोकनगर गोल्ड, शताब्दी, कोथरूड, चतुःशृंगी, सहकारनगर आणि विजयनगर या लायन्स क्लबच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. लायन रविंद्र सातपुते, सलिल कारखानीस, सुजाता कारखानीस आणि सतीश सांडभोर उपस्थित होते. लायन पराग पाटील व गोपेंद्र पाटस्कर यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.

बालेवाडी वेलफेअर फेडरेशनचे दफेदार सिंह, इंद्रजीत कुलकर्णी, शकील सलाती, शुभांगी चपाते, वंदना चौधरी, रूपाली रायकर, सचिन पाटील, योगेश डुंबरे, योगेंद्र सिंह आणि शैलेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले. मोरेश्वर बालवडकर आणि वैभव आढाव यांनी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

See also  छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे