रक्तदानातून माणुसकीचा संदेश: भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेनमध्ये आरोग्य जागृतीचा उपक्रम

पुणे : राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारती विद्यापीठ रुग्णालय व रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी स्वतः आतापर्यंत ३० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केल्याचे सांगत रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू व्यक्तीच्या जीवनाला आधार देणारे सेवाकार्य असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थिनींनी नियमित आरोग्य तपासणीबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमाला डॉ. राहुल तोलनुरे, डॉ. प्रत्युष व त्यांच्या वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण साथ दिली. त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान प्रक्रिया पार पाडली. शिबिरादरम्यान रक्तदानासोबत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आल्याने विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली. स्वेच्छा रक्तदानाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार व डॉ. सुवर्णा चोरगे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकरकर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता जाधव यांनी शिबिराचे नियोजन व समन्वय केले.

‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून आयोजित या उपक्रमाने महाविद्यालयीन परिवारात सेवाभाव, आरोग्य जागरूकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ केली. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाला या उपक्रमातून ‘सेवेतून समाज, जागृतीतून सशक्तीकरण’ असा अर्थपूर्ण संदेश मिळाला.

See also  नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती