पुणे : स्पेशल फॉर्टी फेसबुक ग्रुप, आशयघन आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भक्ती बर्वे इनामदार स्मृती करंडक’ राज्यस्तरीय दोन अंकी मराठी नाटक स्पर्धेत रंगविभोर प्रस्तुत ‘रमा V/s रॅमी’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम क्रमांक पटकावत मानाचा स्मृती करंडक आपल्या नावे केला.
अण्णाभाऊ साठे सभागृहात ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ‘रमा V/s रॅमी’ या नाटकाने तब्बल १० नामांकनांमध्ये स्थान मिळवत अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशा विविध विभागांत उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत संपूर्ण महाराष्ट्रातून २३ नाट्यसंघ सहभागी झाले होते. त्यापैकी ९ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, बुलढाणा, लातूर आणि रत्नागिरी येथील नाट्यसंघांमध्ये अंतिम फेरीत चुरशीची स्पर्धा रंगली.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी तसेच ‘नाट्यपुष्प’च्या नेहा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन झाले. डॉ. समीर मोने, सौरभ पारखे आणि मंदार नामजोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
‘रमा V/s रॅमी’ची पुरस्कारांवर मोहोर
‘रमा V/s रॅमी’ने मिळवलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :
– सांघिक प्रथम क्रमांक – भक्ती बर्वे इनामदार स्मृती करंडक – रंगविभोर
– सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम – माधव जोगळेकर
– सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय द्वितीय – आसावरी कुलकर्णी
– सहअभिनेता प्रथम – आयुष जुमले
– सहअभिनेत्री प्रथम – अपर्णा सहस्त्रबुद्धे
– सहअभिनेत्री द्वितीय – स्वरूपा कदम
– दिग्दर्शन प्रथम – अपर्णा सहस्त्रबुद्धे
– लेखन प्रथम – माधव जोगळेकर
– नेपथ्य प्रथम – शबरी कुलकर्णी आणि लक्ष्मी चव्हाण
– प्रकाशयोजना द्वितीय – युसुफ अली खान
दरम्यान, राज्यस्तरीय दोन अंकी नाटकांच्या स्पर्धांना अपेक्षित प्रेक्षक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी खंत व्यक्त केली. नाटक ही केवळ अभिनयाची कला नसून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांसह सर्व तांत्रिक व कलात्मक अंगांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा स्पर्धांमधून कलाकार आणि नाट्यसंघांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. त्यामुळे भविष्यात या स्पर्धांना अधिकाधिक रसिकांचा प्रतिसाद मिळावा आणि नाट्यस्पर्धेची चुरस वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील २३ नाट्यसंघांच्या सहभागातून अंतिम फेरीतील ९ नाटकांपर्यंतचा प्रवास करत ‘रमा V/s रॅमी’ने पटकावलेला स्मृती करंडक हा रंगविभोरच्या संपूर्ण टीमच्या सांघिक मेहनतीची आणि रंगभूमीवरील बांधिलकीची पावती ठरली आहे.
















