पुणे विभाग पदवीधर मतदार निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कायालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे गुरुवारी (ता. ८) आयोजित बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आदी उपस्थित होते.

मतदार यादीत नावाच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी  आणि मतदारांना मतदान पद्धतीची माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना श्री. बकोरिया यांनी यावेळी दिल्या.

डॉ. तुम्मोड म्हणाले, कोणतीही निवडणूक नवीन प्रकारचे प्रशिक्षण असते. त्यामुळे मतदान व मतमोजणी प्रसंगी निर्माण होणारी प्रत्येक संभाव्य परिस्थिती गृहीत धरून त्याची पूर्वतयारी करावी. सर्व बाबी गांभिर्याने घेऊन समन्वयाने निवडणूक यशस्वी करावी. प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे.

श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, मतदारांची संख्या मर्यादित असली तरी मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती मोठी असल्याने सर्व जिल्ह्यांतील निवडणूक प्रशासनाने समन्वय राखणे गरजेचे आहे. आचारसंहितेच्या तक्रारींचे वेळेत निर्मूलन, आचारसंहितेचे पालन होईल याला प्राधान्य द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना, मतदान, मतमोजणी पथके आदींचे प्रशिक्षण, मतदान केंद्रे, स्ट्राँगरूम, टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राद्वारे (ईडीसी) मतदानाची व्यवस्था, मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या किमान आवश्यक सुविधा, मतदान प्रक्रिया, आचारसंहिता आदींच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण व नियंत्रण कक्ष, स्वीपअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम आदींविषयी माहिती सादर करण्यात आली.

पोलीस विभागाच्यावतीने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस मनुष्यबळाचे नियोजन आदींची माहिती देण्यात आली.

See also  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ ; मुख्यमंत्र्यांनी चालवला ट्रक