पाषाण : पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाची धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाषाण-सुतारवाडी परिसरात घडली. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. कल्याण रेसिडन्सी, शिवालय सोसायटी, साई चौक, पाषाण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मुख्य आरोपी बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायन याच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर भोईन याने बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायन याच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. मात्र, ही रक्कम परत केली जात नसल्याने दोघांमध्ये आर्थिक वाद सुरू होता. या वादात सहदेव शर्मा मध्यस्थी करत होते. दरम्यान, सहदेव यांनी आपल्या आई आणि पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचा गैरसमज आरोपीच्या मनात निर्माण झाला होता. याच कारणावरून आरोपीने सहदेव यांना मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
रविवारी रात्री सहदेव हे मित्र ओंकार डोईफोडे यांच्यासोबत पाषाणमधील साई चौक परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी बंटी आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी चर्चेच्या बहाण्याने सहदेव यांना सुतारवाडी येथील आयटीआय मैदानाच्या गेटबाहेर बोलावले. तेथे आई आणि पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर तिघांनी सहदेव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सहदेव यांनी प्रतिकार केला असता, आरोपीने कंबरेला लावलेला धारदार कोयता काढून त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे बंधू कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सुसगाव) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाषाण-सुतारवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.















