विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; ५० हजार रुपयांपर्यंत पारितोषिके

मुंबई, दि. १२ : महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्क या मूल्यांविषयी जाणीव जागृत करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्या अंतर्गत महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, विजेत्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी कृषी, पशुविज्ञान, मत्स्यविज्ञान आणि आरोग्यविषयक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही गटांसाठी विद्यापीठ स्तरावर स्वतंत्र पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार ५०० आणि ५ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

त्याचप्रमाणे राज्यस्तरावर पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. निबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत स्वहस्ताक्षरात लिहून ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संकेतस्थळावर सादर करावा. निबंध सादर करण्यासाठी प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘प्रोग्राम’ या विभागाचा वापर करावा.

स्पर्धेच्या सविस्तर सूचना, नियम, अटी व कार्यपद्धती यांची माहिती https://dbaspratishthan.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निबंधांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर याच संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातील.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, बंधुता, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत ; डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरिया प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी