पुणे : कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ४४ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार व शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांची भेट घेतली. यावेळी जयराम गृह रचना सहकारी संस्थेच्या सभासदांसोबत आयोजित बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासमोर निवेदनाद्वारे समस्या मांडणार असल्याचे आश्वासन धंगेकर यांनी दिले.
या भेटीदरम्यान धंगेकर यांनी यापूर्वी पूर्ण झालेल्या एसआरए प्रकल्पांतील इमारतींची पाहणी केली. तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एसआरए प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
एसआरएचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. वारंवार तक्रारी करून आणि कारवाईची मागणी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी बांधकाम व्यावसायिक आणि काही राजकीय नेत्यांचे हित साधले जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एसआरए प्रकल्पांची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या हक्कांचा, निवासाच्या सुविधांचा आणि सुरक्षिततेचा विचार व्हावा, तसेच प्रलंबित तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीला सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक राजकुमार म्होकर, मनोहर धनावडे, शिवाजी सोनार, राजेंद्र मगर, किशोर सोनार, राहुल वांजळे, अमर टकले, निकुंज उभे, सुरेश तनपुरे, विजय ढवळे, संजय खोपडे, सचिन यादव, सुजीत पोळेकर, रमेश कंधारे, अजय काजिक, आदित्य उभे, ज्ञानेश्वर भोसले, संगीता भोसले, सागर वाहळे, अभिजित मोरे, वेद येनपुरे, संतोष भगत, कुणाल पोळ, गणेश मारणे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रभागातील उमेदवार नयना सोनार, वत्सला कानगुडे, मथुराबाई मारणे, योगिता तोंडे, आशा भगत आणि मंगल वांजळे यांच्यासह सोसायटीचे सुमारे २०० सभासद बैठकीला उपस्थित होते.















