बाणेर : बालेवाडी स्टेडियमसमोरील महामार्गालगत असलेला कचरा डेपो अखेर बंद करण्यात आला आहे. या डेपोमुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसह आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या प्रश्नावर मोरेश्वर बालवडकर यांनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पुणे महानगरपालिका आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बालेवाडी स्टेडियमसमोरील कचरा डेपोमुळे परिसरातील स्वच्छता, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत नागरिकांकडूनही त्रास व्यक्त केला जात होता. ही समस्या लक्षात घेऊन बालवडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत नागरिकांची व्यथा मांडली. संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
या प्रक्रियेत राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाशी समन्वय साधण्यात आल्याचे सांगण्यात आले.कचरा डेपो बंद झाल्याने परिसरातील स्वच्छता सुधारण्यास आणि दुर्गंधीचा त्रास कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रश्न मार्गी लागू शकतात, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी आणि परिसराच्या स्वच्छतेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी यापुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची भूमिका मोरेश्वर बालवडकर यांनी मांडली.
















