अंबडवेट : स्वर्गीय सुभाषभाऊ अमराळे सोशल फाउंडेशन, अंबडवेट, ता. मुळशी, जि. पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील स्पर्धकांसाठी भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लेखनकौशल्याला प्रोत्साहन देणे आणि स्पर्धकांना आपल्या विचारांना शब्दरूप देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्पर्धेत तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता पहिली ते सातवी, दुसरा गट इयत्ता सातवी ते बारावी आणि तिसरा गट खुला असणार आहे. या गटांसाठी अनुक्रमे ‘माझी आवडती सहल’, ‘उत्सव असे साजरे करावेत’ आणि ‘माझ्या स्वप्नातील मुळशी पॅटर्न’ हे निबंधाचे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेचे एकूण पारितोषिक मूल्य २० हजार रुपये असून, प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पात्र स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धकांनी निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात ए-४ आकाराच्या कागदावर, एका बाजूला योग्य समास सोडून स्वच्छ अक्षरात लिहावा. टंकलिखित निबंध स्वीकारले जाणार नाहीत. निबंधाची पीडीएफ फाईल २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत खालील व्हॉट्सॲप क्रमांकांवर पाठवावी. निबंधाच्या शेवटच्या पानावर स्पर्धकाचे नाव, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव, इयत्ता, गट आणि व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. आक्षेपार्ह, राजकीय किंवा विषयाशी असंबंधित मजकूर असल्यास नोंद अपात्र ठरविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल, पारितोषिक वितरणाचे ठिकाण आणि वेळ स्पर्धकांना कळविण्यात येईल. आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ९१५८०३९७९७, ९८५०६७२६७२, ९९२२४४३६३६.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रदीप गावडे यांनी केले आहे.
















