पुणे : पुणे शहर आणि महानगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता भारतीय प्रबंधन संस्थान, मुंबई (आयआयएम) या नामांकित संस्थेची मदत घेतली जाणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून शहरातील वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण सुविधांचा सर्वंकष अभ्यास करण्यास संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात संस्थेच्या तज्ज्ञांची पुण्यात विविध विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली असून, वाहतूक समस्यांवर शास्त्रीय पद्धतीने दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.
पुणे शहर आणि महानगर परिसरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी २८ सप्टेंबर रोजी आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांना पत्र पाठविले होते. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा स्वतंत्र प्रकल्पांपुरता विचार न करता संपूर्ण महानगर क्षेत्राची एकात्मिक वाहतूक व्यवस्था म्हणून अभ्यास करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्याला आयआयएम मुंबई या संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला.
या पत्रानुसार आयआयएम मुंबईच्या प्राध्यापक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांची आज प्राथमिक बैठक झाली. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पुणे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, वाहतुक नियोजक निखिल मिजार, आयआयएमच्या वतीने ले. कमांडर (नि.) निशा सिंग, प्रा. राकेश राऊत, प्रा. रवींद्र गोखले, प्रा. रोझी मित्रा यांच्यासह महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, एनएचएआय, आरटीओ, एमएसआयडीसी, पीएमपीएमएल यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतुकीच्या समस्यांचे स्वरूप, अभ्यासाची व्याप्ती आणि पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे महानगर परिसराची लोकसंख्या सुमारे एक कोटी असून, आगामी तीन दशकांत ती दोन कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २०१८ मधील ५२ लाखांवरून २०२६ मध्ये ८१ लाखांपर्यंत वाढली आहे. दररोज एक हजार ३०० हून अधिक वाहनांची भर पडत असल्याने रस्त्यांवरील ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि एकात्मिक वाहतूक नियोजनाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले असून, या अनुषंगाने हा शास्त्रीय अभ्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असे मा. मुरलीधर मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले.
शहरातील प्रमुख रस्ते, वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, सिग्नल यंत्रणा, सार्वजनिक वाहतूक, मेट्रोचे जाळे आणि प्रस्तावित रिंगरोड यांचा एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. सध्या वाहतूक पोलिस, महापालिका आणि अन्य यंत्रणांकडून सिग्नल समन्वय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहतुकीचे विश्लेषण आणि प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, वाढत्या वाहनसंख्येचा विचार करता दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
आयआयएम मुंबई ऑपरेशन्स रिसर्च, वाहतूक व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांत देशात एक अग्रणी संस्था आहे. यातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर आणि भविष्यातील गरजा लक्षात घेत उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
या अभ्यासासाठी पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल), प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधण्याची अपेक्षा आहे. अभ्यासातून प्राप्त होणाऱ्या शिफारशींच्या आधारे संबंधित यंत्रणांना पुढील उपाययोजना राबविता येणार आहेत.
वाहतूक नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन
– पुणे शहरासह संपूर्ण महानगर परिसरातील वाहतुकीचा अभ्यास
– वाहतूक कोंडीची कारणे आणि प्रमुख रस्त्यांवरील समस्यांचे विश्लेषण
– सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापनातील सुधारणांचा विचार
– मेट्रो, पीएमपीएमएल आणि अन्य वाहतूक सुविधांचा समन्वय
– वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले ‘‘पुण्याची वाहतूक कोंडी ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर समस्या आहे. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी आयआयएम मुंबईसारख्या नामांकित संस्थेच्या तज्ज्ञतेचा उपयोग व्हावा, या उद्देशाने पुढाकार घेतला. संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्राथमिक चर्चेलाही सुरुवात झाली आहे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
















