पुणे : खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याच्या गंभीर मुद्द्यावर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आवाज उठवला. पुणेकरांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर आणि महापालिका आयुक्त यांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देत दूषित पाण्याच्या समस्येवर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात नगरसेवक अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नगरसेवक सहभागी झाले होते. पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
खडकवासला धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो बंद करावा, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा होईल याची खात्री द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
“पुणेकरांना आश्वासने नकोत, शुद्ध पाणी हवे!” अशी ठाम भूमिका मांडत प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, असे अमोल बालवडकर यांनी म्हटले. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नावर महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.















