पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २४ मीटर रुंदीच्या एचसीएमटीआर (HCMTR) आणि ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोड प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी दिले. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनींची वहिवाटीप्रमाणे संयुक्त मोजणी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, पीएमआरडीएचे मा. आयुक्त श्री. अभिजीत चौधरी, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. मनोज पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत दोन्ही प्रकल्पांच्या मार्गातील जमिनींचे सीमांकन व मोजणी निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. राज्य शासनाच्या अखत्यारीतील आवश्यक जागांच्या हस्तांतरणासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्यक पूरक कागदपत्रे व तांत्रिक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या.
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या प्रकल्पांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे मा. अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले.
तसेच, आगामी ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ च्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते जाळे आणि वाहतूक व्यवस्थेच्या पूर्वतयारीचाही आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या संरक्षण व रेल्वे विभागाच्या जागांसंदर्भातील प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, राज्य शासनाच्या जागा आणि खासगी जमिनींच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पीएमआरडीए यांच्यात समन्वयाने कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.














