पाषाण-सुस रस्त्यावर अपघातांचा धोका; चेंबरची झाकणे व खड्डा तातडीने दुरुस्त करा! मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलनाचा इशारा

पाषाण : पाषाण येथील सुस रस्त्यावरील एकतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटाराच्या चेंबरशेजारी मोठे भगदाड पडले असून, वाकेश्वर चौकातील बसथांब्याजवळील पावसाळी गटाराच्या चेंबरचे झाकण गेल्या आठ दिवसांपासून गायब आहे. या दोन्ही ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासाठी मनसेने महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

एकतानगर परिसरातील चेंबरशेजारील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे. तसेच वाकेश्वर चौकातील बसथांब्याजवळ चेंबरचे झाकण नसल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही ठिकाणी नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या समस्यांबाबत नागरिक आणि महिलांनी ऑनलाइन तक्रारी केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. तरीही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

यासंदर्भात मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) मनसेच्या वतीने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत एकतानगरमधील खड्डा बुजवून तसेच वाकेश्वर चौकातील चेंबरवर नवीन झाकण बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महापालिका कार्यालयासमोर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, सज्जन नरवडे, विजय ढाकणे, संतोष रोडगे, रणजीत गिलबिले, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  केंद्रीय रेल्वे कमिटी च्या सदस्य पदी विनोद मोहिते यांची निवड