पासपोर्ट कार्यालय बाणेर येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पुण्यात वॉकथॉन; भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासनाचा संदेश

पुणे : राष्ट्रीय एकता दिन आणि दक्षता जनजागृती अभियान २०२६ निमित्त परराष्ट्र मंत्रालयांतर्गत कार्यरत क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या वतीने शनिवारी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून प्रामाणिकपणा, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.

या वॉकथॉनमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), पोलीस विभाग, डाक विभाग, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे महानगरपालिका, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.’समृद्धीसाठी सचोटी’ (Probity for Prosperity) ही या अभियानाची संकल्पना असून, सार्वजनिक प्रशासनात नैतिक आचरणाला प्राधान्य देणे, भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणे आणि सरकारी यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

यावेळी पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी सार्वजनिक सेवा पुरविताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना निष्पक्ष, कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षता व प्रशासकीय उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागींच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासह राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विविध शासकीय आणि खासगी संस्थांच्या एकत्रित सहभागातून राष्ट्रीय एकता, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमधील सचोटी यांचा संदेश या वॉकथॉनच्या माध्यमातून देण्यात आला.

See also  होळीच्या आधी दिवाळी, रोहितच्या पलटनने दुबईत फडकवला तिरंगा