पिरंगुट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लवळे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिरा’चे आयोजन रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लवळे येथे करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे संचालक मा. प्रा. डॉ. हरीश नवले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. यावेळी व्यासपीठावर रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. श्री. धोंडिबा कुंभार , प्रा. भरत कानगुडे, श्री. अनिल केदारी, कार्याध्यक्ष ॲड. उत्तम ढोरेसाहेब, उपाध्यक्ष- मा. श्री. आनंदा राऊत, सचिव- मा. श्री. सुदाम गावडे, सल्लागार- मा. श्री. संजय सातव, वक्ते- मा. ॲड. बाबुराव हंद्राळे, डॉ. श्रीकांत नाडगौडा, मा. श्री. बाबासाहेब खराडे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गुळीग, केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो म्हणाले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबर समाजासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार आहे. तसेच महाविद्यालयाची नाळ समाजाशी जोडण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच समाजाबरोबर राहून त्यांच्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालय लवळे गावच्या ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारश्याशी जोडले जात आहे याचा आनंद वाटतो. पुढे ते म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी महाविद्यालयास अनमोल मदत केलेली आहे, त्यातूनच अद्ययावत सोयीसुविधांसह सर्वगुण संपन्न महाविद्यालय उभे आहे. मुळशी तालुक्यातील अनुदानित असलेले आपले एकमेव महाविद्यालय माफक फी आणि सर्व विद्याशाखांचे शिक्षण देत आहे. तसेच आजच्या काळाशी सुसंगत असलेले विविध नाविन्यपूर्ण आणि व्यावसायिक कोर्सेसची सुरुवात करत आहे. त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे. पुढे त्यांनी महाविद्यालय ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक ते विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे संचालक मा. प्रा. डॉ. हरीश नवले यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची सविस्तर माहिती देऊन त्याची कार्यपद्धती अधोरेखित केली. कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुढे त्यांनी विद्यापीठाच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी अधोरेखित करून बहि:शाल शिक्षण मंडळासाठी ज्या ज्या मान्यवरांनी वक्ते म्हणून काम पाहिले त्या सोनोपंत दांडेकर यांच्यासह विविध मान्यवर वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघांनी बहि:शाल शिक्षण मंडळाशी जोडले जाण्याचे आवाहन केले. सुरुवात अगदी दहा- पंधरा ज्येष्ठ नागरिकांपासून झाली तरी हरकत नाही. तसेच ज्येष्ठांना जे कार्यक्रम हवे आहेत ते आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राबविण्यासाठी विद्यापीठाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे सांगितले.
शिबिर एकूण दोन सत्रांमध्ये संपन्न झाले.
शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये मा. ॲड. बाबुराव हंद्राळे यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्यसूत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सांगून समाजवास्तवाचा वेध घेतला. मा. डॉ. श्रीकांत नाडगौडा यांनी आपल्या विनोदी आणि उत्साहपूर्ण शैलीत ‘याला जीवन ऐसे नाव’ हा विषय हास्यविनोदातून समजावून सांगितला. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गुळीग यांनी मराठी गीत, भजन, गवळणी, विठ्ठलाची गाणी तसेच हिंदी चित्रपटातील गाणी गाऊन उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मन जिंकले. मा. श्री. बाबासाहेब खराडे यांनी ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ हा विषय मांडताना समाजमनाचा आढावा घेऊन विनोदी कविता, विनोद, विडंबन गीत सादर करून ज्येष्ठांना हसवत ठेवले. सर्व वक्त्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आनंद देण्याचे कार्य साधले. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमास दाद देत विविध विषयांवरील कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.
शिबिर आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. ए. एम. जाधव तसेच लवळे गावचे माजी सरपंच संजयआबा सातव, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघातील कार्यकारिणीतील सदस्य यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. संतोष वाढवणकर, प्रा. दीप सातव, प्रा. गणेश डोके, संतोष गिरी यांनी काम पाहिले. कार्यालयीन अधीक्षक श्री. रमेश गिरमकर, श्री. निलेश ठोंबरे, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे, श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस, श्री. कैलास गुढेकर, श्री. सुकळकर डी. के., श्री. दत्तात्रय चौधरी आदींनी सहकार्य केले. शिबिरासाठी लवळे गावातील ज्येष्ठ महिला-पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.















