‘अपेक्षा’ मासिकाचा २९ वर्षांचा साहित्यिक प्रवास; दीपावली विशेषांकाचे उत्साहात प्रकाशन

पुणे : साहित्य क्षेत्रात सातत्याने २९ वर्षांची परंपरा जपणाऱ्या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन नवी पेठ येथील पत्रकार भवनात उत्साहात पार पडले. साहित्याचा गौरव, युवा गुणवंतांचा सन्मान आणि निमंत्रित कवींच्या काव्यरचनांनी हा सोहळा विशेष रंगतदार ठरला.

निवृत्त मुख्य वनसंरक्षक तथा ह.भ.प. रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते दीपावली विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. ईश्वर अगरवाल, ज्येष्ठ साहित्यिक व उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रज्ञा गौरकर उपस्थित होत्या.

गेल्या २९ वर्षांपासून ‘अपेक्षा’ मासिकाच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. हा दीपावली विशेषांक साहित्य क्षेत्राला दीपस्तंभाप्रमाणे दिशा देत राहो, अशी अपेक्षा प्रमुख पाहुणे रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केली. चंद्रलेखा बेलसरे यांनी मासिकाच्या प्रदीर्घ साहित्यिक वाटचालीचे कौतुक करत विशेषांकाचा आढावा घेतला. डॉ. ईश्वर अगरवाल यांनीही अंकाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा गुणवंतांना ‘अपेक्षा युवा विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राऊन पुरस्कार विजेत्या गीता महेश मालुसरे, आयएसएसओ सिल्व्हर मेडल विजेता बॅडमिंटनपटू शिवराज पाचपुते आणि आदित्य राजेंद्र मराठे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

विशेषांक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रित कवी संमेलनाने कार्यक्रमात साहित्यिक रंगत आणली. उपस्थित कवींनी सादर केलेल्या काव्यरचनांना रसिकांची दाद मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक दत्तात्रय उभे यांनी केले. सूत्रसंचालन मनीष गोखले यांनी केले, तर सहसंपादक डॉ. संजय जगताप यांनी आभार मानले.

विशेषांकाच्या निर्मितीसाठी संपादक दत्तात्रय उभे, सहसंपादक डॉ. संजय जगताप, उपसंपादिका सुनीता उभे, कार्यकारी संपादक कुणाल उभे, व्यवस्थापक श्रद्धा शिंदे, श्रद्धा उभे, राजेंद्र सगर, अस्मिता मराठे तसेच अपेक्षा परिवारातील सदस्यांनी विशेष योगदान दिले.

See also  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू