संगमवाडीत पाण्याची टंचाई; प्रलंबित पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करा! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका प्रशासनाकडे मागणी

पुणे : संगमवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, प्रलंबित असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात मनसेचे शिवाजीनगर-कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उपशहर अध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. संगमवाडी परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संगमवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजातील दिरंगाईमुळे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कामाचा आढावा घेऊन पाण्याच्या टाकीचे बांधकाम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावे आणि नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या पाणीप्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

See also  पुणे कॅन्टोंमेंटमध्ये टपाली मतदानाला सुरुवात