पुणे : एरंडवणे येथील पौड रस्त्यावरील श्री जय राम सहकारी गृहरचना संस्था, सर्व्हे क्रमांक ४४/२ येथील पुनर्विकास प्रकल्प गेल्या सुमारे ३० वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पातील रहिवाशांना न्याय मिळावा आणि रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी क्लस्टर (समूह) पुनर्विकास योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात प्रकल्पाचा इतिहास, विकासक बदलण्याची प्रक्रिया आणि पुनर्विकास रखडल्यामुळे रहिवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत.
संस्थेच्या निवेदनानुसार, २८ डिसेंबर १९९५ रोजी बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे, के. एम. जोग आणि ए. के. भट यांच्यासोबत मूळ करार करण्यात आला होता. १९९६ ते १९९९ या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन होते. २२ जानेवारी १९९६ रोजी तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते.
त्यानंतर शारद ग्रुपचे ज्ञानेश्वर आगाशे हे भागीदार म्हणून प्रकल्पात सहभागी झाले. मात्र, २००५ मध्ये त्यांच्या निधनानंतर हा प्रकल्प सी. यू. डेव्हलपर्सचे ललित कुमार जैन यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या हस्तांतरण प्रक्रियेत संस्थेची संमती, सभासदांची मान्यता आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
नवीन विकासकासोबत स्पष्ट करार अथवा संवाद नसताना प्रकल्पाचा ताबा हस्तांतरित झाल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. परिणामी, गेली सुमारे ३० वर्षे १० महिने हा प्रकल्प रखडल्याने रहिवाशांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत एसआरए किंवा अन्य संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित न्याय मिळत नसल्याने क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेने या प्रकरणात पुढाकार घेऊन प्रकल्पाची वस्तुस्थिती तपासावी आणि उपलब्ध विकास नियंत्रण नियमांनुसार क्लस्टर पुनर्विकासाची शक्यता पडताळून पाहावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात ४ नोव्हेंबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक राजकुमार म्होकर, काळे काका, राहुल वांजळे, प्रथमेश ढोक, स्वप्नील भोसले आणि सागर भगत उपस्थित होते. रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
















