ग्रामीण भागातील मुलांना रघुकूल प्रतिष्ठानतर्फे मोफत आध्यात्मिक शिक्षण; दर रविवारी ५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचन सेवेतून संस्कारांचा जागर

करंदी : ग्रामीण भागातील नवीन पिढीला आध्यात्मिक शिक्षण मिळावे, त्यांच्यावर संस्कार व्हावेत तसेच मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रघुकूल प्रतिष्ठान, करंदी यांच्या वतीने मोफत आध्यात्मिक शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत परिसरातील विविध गावांमधील सुमारे ५० मुले दर रविवारी ह.भ.प. नाईकर सर आणि ज्ञानेश्वरी ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. मुलांना हरिपाठ, कीर्तन, प्रवचन आदींचे प्रशिक्षण दिले जात असून, या माध्यमातून त्यांच्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण करण्याबरोबरच आत्मविश्वास आणि वक्तृत्वकौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विशेष म्हणजे, या प्रशिक्षणातून तयार झालेली लहान मुले गावागावांतील शाळांमध्ये जाऊन हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचन सेवा विनामूल्य देत आहेत. भविष्यात ग्रामीण भागातून चांगले कीर्तनकार आणि प्रवचनकार घडावेत, हा संस्थेचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येते. अशा प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम गावोगावी आयोजित करण्यासाठी इच्छुक संस्था व मंडळांना रघुकूल प्रतिष्ठानतर्फे आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक विलासराव बोरगे यांनी दिली. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक गावांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

See also  विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर जिल्हाधिकारी अजय मोरे