पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी आणि शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करणारी ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ आज ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात आशेचा नवा दीप ठरत आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जन्मभूमी खानवडी येथे साकारलेला हा शैक्षणिक उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे. समता, बंधुता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार आधुनिक शिक्षणव्यवस्थेशी जोडत ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रगत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न आहे. राज्यातील पहिली जिल्हा परिषद सीबीएसई शाळा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या उपक्रमातून ग्रामीण शिक्षणाच्या परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.
पुरंदर तालुक्यातील खानवडी… इतिहास, परंपरा आणि सामाजिक जागृतीचा संगम असलेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माने गौरवलेली आणि महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित झालेली ही भूमी आज आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाची साक्षीदार ठरत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून उभारण्यात आलेली ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ ही केवळ एक शाळा नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देणारा महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रयोग आहे.
द्विशताब्दी जयंती वर्षात विचारांना कृतीतून अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी खानवडी येथे झाला. त्यांच्या जन्माच्या दोनशेव्या वर्षात पदार्पण होत असताना, त्यांच्या जन्मभूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हा उपक्रम साकार होणे ही विशेष अभिमानाची बाब आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मुलींचे शिक्षण, वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा विचार त्यांनी कृतीतून रुजवला. आज त्याच विचारांना आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न ‘ज्योती सावित्री’ शाळेतून होत आहे. त्यामुळे ही शाळा म्हणजे महात्मा फुले यांच्या शैक्षणिक विचारांना त्यांच्या जन्मभूमीतून दिलेले एक कृतीशील अभिवादनच आहे.
समतेच्या विचारांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोड
या शाळेच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू म्हणजे शिक्षणातील समान संधी. आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. वार्षिक उत्पन्नाची निर्धारित मर्यादा असलेल्या कुटुंबांतील मुलांना प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे.शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीचे साधन बनावे, ही महात्मा फुले यांची भूमिका होती. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करण्याचा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘ज्योती सावित्री’ शाळेच्या माध्यमातून हाच विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत आहे.
बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था
या शाळेत बालवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून सध्या सुमारे २६० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थीसंख्या ठेवून विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यावर भर दिला जात आहे.पुढील टप्प्यात सहावीपासून प्रवेश गुणवत्तेच्या आधारे दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड परीक्षा पद्धतीने करण्यात येणार आहे. एकूण सुमारे १ हजार ८४० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या शाळेत बालवाडी ते पाचवीपर्यंत दिवसभराचे, तर सहावी ते बारावीपर्यंत निवासी शिक्षणाचे नियोजन आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
१२ एकर परिसरात आधुनिक सुविधांचे शैक्षणिक संकुल
सुमारे १२ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. प्रशस्त वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा आणि प्रशासकीय इमारतीसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पूरक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.पुढील टप्प्यात वसतिगृह, भोजन व्यवस्था, संगणकाधारित शिक्षण, कौशल्यविकासासाठी विशेष प्रयोगशाळा, वाचनालय आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांप्रमाणेच संधी मिळाव्यात, या दृष्टीने हा प्रयत्न महत्त्वाचा आहे.
केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट
आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि विविध कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन शाळेत विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, संगणक साक्षरता आणि कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व दिले जाणार आहे. विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. मोफत आहार, दूध, नियमित आरोग्य तपासणी, वाहतूक सुविधा, गणवेश आणि पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शिक्षणासोबत आरोग्य, पोषण, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
शासन आणि समाज सहभागाचा अभिनव प्रयोग
या शाळेची मालकी पुणे जिल्हा परिषदेकडे असून तिचे संचालन स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येते आहे. शासनाच्या पुढाकाराला सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि विविध निधी व देणग्यांची जोड देत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयोग भविष्यात अन्य जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ज्योती सावित्री’ शाळा ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून ग्रामीण परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त केला होता. येथे घडणारे विद्यार्थी उद्याचे सक्षम नागरिक बनतील आणि या शाळेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘ज्योती सावित्री’ शाळेच्या उभारणीमागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकल्पाला आकार देण्यात आला आहे.
ग्रामीण शिक्षणाच्या नव्या भविष्याची आशा
‘ज्योती सावित्री’ शाळेचा खरा परिणाम केवळ विद्यार्थीसंख्येपुरता मोजता येणार नाही. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे, शिक्षणातील असमानता कमी होणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे आणि भविष्यातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी त्यांची तयारी होणे, हे या प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट आहे.
खानवडीसारख्या ऐतिहासिक गावात उभा राहिलेला हा शैक्षणिक प्रयोग ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा जो विचार रुजवला, त्याच विचारांचा आधुनिक काळातील आविष्कार म्हणून या शाळेकडे पाहता येईल.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ अभिवादनापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविणे ही काळाची गरज आहे. इतिहासाच्या प्रेरणेला आधुनिकतेची जोड, समतेच्या विचारांना गुणवत्तेची साथ आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना संधी देणारा ‘ज्योती सावित्री’ शाळेचा उपक्रम याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्ञान, समता आणि संधी यांचा संगम घडविणारी ही शाळा ग्रामीण महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिवर्तनाचा नवा दीप ठरावी, हीच अपेक्षा!
– युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे















