बाणेरमध्ये दिवाळी पहाट भक्तिसंगीताचा सुरेल सोहळा; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उपेंद्र भटजी, जगदीश चव्हाण आणि कृपा नाईक यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध

बाणेर : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बाणेर येथे भाजपा नेते गणेश कळमकर व माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भक्तिसंगीत, सुरेल गीते आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भट, इंडियन आयडॉलचे सहविजेते जगदीश चव्हाण आणि सुप्रसिद्ध गायिका कृपा नाईक यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा शहर सरचिटणीस गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, बाणेर-बालेवाडी-औंध भागाचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाणेर-बालेवाडी भागाचे कार्यवाह संजय वाघुळदे, डॉ. राजेश देशपांडे, माजी पोलीस अधिकारी अजय कदम, धनंजय केवटे, पराग जोशी, उमाताई गाडगीळ, पांडुरंग तात्या कळमकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दिवाळीच्या पहाटे संगीत आणि भक्तीच्या सुरांनी बाणेर परिसरातील वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाले. नागरिकांचा मोठा सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय ठरला. आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

See also  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा