मुळशी : मुळशी तालुक्यातील मुठा ते लवासा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी आणि अपूर्ण कामांमुळे प्रवास धोकादायक बनला असून, याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले.
या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे आणि पाणी साचले आहे की मूळ रस्ताच दिसेनासा झाला आहे. पावसाळ्यापूर्वी गटारे स्वच्छ न करणे, खड्डे न बुजवणे तसेच रखडलेली दुरुस्ती यामुळे रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात तालुका प्रमुख सचिन खैरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, सरपंच दिलीप गोळे, हनुमंत सुर्वे, प्रशांत जोरी, माऊली साळेकर, राजेश दगडे, आकाश भरेकर, रवींद्र भुंडे, हरिभाऊ पडवळ, विजय मारणे, अमित मारणे, शिवाजी गुंड, शिवजी उभे, किसन लेकवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















