पुणे विद्यापीठ ते महाळुंगे बालेवाडी स्टेडियमदरम्यान कामांचा समन्वय हरवला; जनतेच्या पैशांची उधळपट्टी कोण रोखणार? बाणेरमध्ये नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदला

बाणेर : एकीकडे सुस्थितीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे, तर दुसरीकडे त्याच रस्त्यावर पुन्हा खोदकाम सुरू आहे. बाणेर परिसरात महावितरणच्या या अजब कारभारामुळे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्ता तयार करायचा, त्यावर डांबर टाकायचे आणि दुसऱ्याच दिवशी तोच रस्ता खोदायचा, असा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठ ते बालेवाडी स्टेडियमदरम्यान बाणेर रस्त्याच्या एका मार्गिकेवर रात्रीच्या वेळी मूळच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ता सुस्थितीत असताना त्यावर डांबरीकरण करण्याची आवश्यकता काय, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, बाणेर गावठाणाजवळील दत्तमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अवघ्या एक दिवसापूर्वीच याच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. चौकशीअंती हे खोदकाम महावितरणकडून करण्यात येत असल्याचे समोर आले. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचे नियोजन आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय नेमका कुठे हरवला आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सामान्यतः रस्त्यावरील छोटासा खड्डा बुजवला किंवा एखादे चेंबर दुरुस्त केले, तरी त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात. मात्र, सुस्थितीतील रस्त्यावर डांबरीकरण आणि त्यानंतर लगेच खोदकाम अशा प्रकारांबाबत जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

रस्ते बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी खर्च होणारा निधी हा जनतेच्या करातून जमा झालेला पैसा आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावर वारंवार कामे करून सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये, यासाठी महापालिका आणि महावितरणने परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

रस्ता बांधण्यापूर्वी नियोजन आणि खोदण्यापूर्वी समन्वय साधण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल बाणेरमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणने रस्ता खोदण्यापूर्वी संबंधित यंत्रणांची परवानगी, कामांचे वेळापत्रक आणि रस्त्याच्या पूर्ववत दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

See also  "ट्रायंगल" मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट