पुणे : पुण्यातील मोटारसायकलस्वार तथा भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी वेदांत वाघ याने अवघ्या 19 व्या वर्षी भारताचा सुवर्ण चतुष्कोण मार्ग मोटारसायकलवरून एकट्याने पूर्ण करून नवा इतिहास रचला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांना जोडणारा सुमारे 6000 किलोमीटरचा हा मार्ग साहस, जिद्द, शारीरिक क्षमता आणि धैर्याची कठीण परीक्षा घेणारा मानला जातो.
दिवाळीच्या सुट्टीत हा प्रवास करण्याचे वेदांतने ठरवले. केवळ प्रवास करण्याऐवजी एखादा विक्रम प्रस्थापित करता येईल का, या विचारातून त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील ‘सर्वात कमी वयात सुवर्ण चतुष्कोण पूर्ण करण्याचा’ विक्रम गाठण्याचे ध्येय ठेवले. यापूर्वीचा विक्रम 2020 मध्ये 19 वर्षे 11 महिने वयाच्या युवकाने 16 दिवसांत पूर्ण केला होता. त्यावेळी वेदांतचे वय 18 वर्षे 8 महिने होते.
9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.17 वाजता भारती विद्यापीठ, धनकवडी येथून सुरू झालेला हा प्रवास त्याने 21 नोव्हेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला. 12 दिवस 9 तासांत 6049 किलोमीटरचा टप्पा पार करत भारतातील सर्वात कमी वयात आणि या वयोगटात सर्वात कमी वेळेत सुवर्ण चतुष्कोणाची सोलो राईड पूर्ण करणारा तो पहिला युवक ठरला.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मालक व प्रवासी वाहतूक संघटना आणि भारती विद्यापीठ परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी सत्कार करताना सांगितले की, एवढ्या कमी वयात असा प्रवास पूर्ण करणे हे खंबीर मानसिक क्षमतेचे प्रतीक असून वेदांतचा हा पराक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
भारती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. स्वप्निल विधाते म्हणाले की, असा प्रवास हा साहसी खेळाचा अत्युच्च उपक्रम आहे. रस्त्यावरील विविध धोके आणि आव्हानांना सामोरे जात सलग 13 दिवस दररोज सुमारे 500 किलोमीटर वाहन चालवणे ही उच्च दर्जाची एकाग्रता, सहनशक्ती आणि कौशल्य दर्शवणारी बाब आहे.यावेळी वेदांतने आपल्या प्रवासातील अनुभव आणि आलेल्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या. भारती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमास भारती विद्यापीठ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वेदांतने आपल्या प्रवासातील अनुभव आणि आलेल्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या. भारती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमास भारती विद्यापीठ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.















