कोथरूड : भारतीय संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांच्यामध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने वंशिका बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान दिन एरंडवणे कोथरूड साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालय तसेच लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती वितरित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि मान्यवरांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच भारतीय संविधानाची निर्मिती, त्याची आवश्यकता, महत्त्व आणि वैशिष्ट्ये याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये कोणती, तसेच लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीव निर्माण करण्याचा संस्थेचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
या यावेळी वंशिका फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शीतल राठोड, सचिव विशाल सातपुते, विश्वस्त अमोल सातपुते, उद्योजक किरण मारणे, भारती विद्यापीठ शिक्षण विभागाचे संचालक एम.डी. कदम, प्राचार्य श्री जी.बी. जाधव, जुनि. कॉलेजच्या नीलम धर्माधिकारी, के. एच. साठपे, संध्या मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. आरती पावडे -सूत्रसंचालक केले तर आभार प्रदर्शन धर्मा मुठे यांनी केले.सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















