पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठ परिसर तसेच कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व अतिक्रमण विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान सार्वजनिक पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच परिसरातील स्वच्छता नियमितपणे राखण्याबाबत आणि दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
धार्मिक स्थळांशी संबंधित विषयांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येईल, असेही मा. महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात निष्काळजीपणा किंवा हयगय आढळल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शहरातील स्वच्छता, सार्वजनिक जागांचे व्यवस्थापन आणि अतिक्रमणमुक्त पदपथ यांना प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी जबाबदारीने व तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त यांनी दिले.















