पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.

वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस विभागाकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस विभागाने निःपक्षपणे तपास करुन सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला विषयक प्रकरणे, जातीय तंटे आदी प्रकरणे जलदगतीने तपास केला पाहिजे. गुन्हा घडूच नये यासाठी सदैव सावध असले पाहिजे. वेल्हा तालुकाच्या विकासासाठी मागणीप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील श्री. पाटील यांनी दिली.

See also  ना. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवाद

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. फुलारी यांनी केले.

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, जुने पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज सन २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.

श्री. पाटील यांनी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते पोलीस स्थानक प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

सहायक निरीक्षक मनोज पवार यांचा सत्कार
यावेळी वेल्हे पोलीस स्थानकचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांनी पानशेत हद्दीत तीन वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीचा ४८ तासात शोध घेतला. हा खटला ‘फास्ट ट्रक कोर्टामध्ये चालविण्यात आला. उत्कृष्ट पद्धतीने तपास करुन पुरावे सादर केल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. याबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून गौरव तसेच गृहमंत्री व पोलीस महासंचालक पदक प्राप्त झालेले आहे.

यावेळी परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

अद्ययावत सुविधा असलेले पोलीस स्थानक
वेल्हे पोलीस स्थानकाचे एकूण चटई क्षेत्रफळ ७८३.३० चौ. मी. आहे. तळमजला मजल्यावर एकूण १२ कक्ष असून पहिल्या मजल्यावर एकूण ६ कक्ष आहेत. या पोलीस स्थानक हद्दीत एकूण १२९ गावे असून क्षेत्रफळाने मोठी हद्द आहे. यामध्ये डोंगर दरे, दोन किल्ले, ३ धरणे व पर्यटन स्थळे, शिवकालीन मेंगाई माता देवीचे मंदीर, महाराणी राजमाता सईबाई समाधीस्थळ, पाल यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपणदेखील केले आहे.