मांजरी सह २३ समाविष्ट गावातील जुना निवासी झोन जागेवर बांधकाम आराखडे पुणे मनपाने मंजूर करावे; विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मागणी

हडपसर : मांजरी उड्डाण पुलाच्या कामांमध्ये जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावी. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट केलेल्या 23 गावातील जुना निवासी झोन असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे अधिकार पुणे महानगरपालिकेला देण्यात यावेत या संदर्भामध्ये हडपसर विधान मतदार संघाचे आमदार चेतन तुपे व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन देत मागणी केली.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट च्या नियमक मंडळाच्या मीटिंगसाठी मांजरी येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित असताना ही भेट घेण्यात आली.
पुणे महानगरपालिकेमध्ये 23 गावांचा समावेश होऊन देखील या गावातील बांधकामांना पुणे महानगरपालिका मंजुरी मिळू शकत नाही. बांधकाम मंजुरीचे अधिकार पीएमआरडीएकडे असल्याने शेतकऱ्यांना टीडीआर एफएसआय मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचे बांधकाम विकास आराखडे पुणे महानगरपालिकेत मंजूर करण्यात यावेत व त्याचे अधिकार पालिकेला देण्यात यावेत असे मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार चेतन तुपे व राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या निवेदनानुसार पुणे जिल्हाधिकारी व पीएमआरडीए आयुक्तांशी फोनवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारे नुकसान भरपाई देखील अधिक मिळणार आहे.

See also  विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना