पाषाण : सकल मराठा समाज औंध पाषाण बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी बावधन परिसरातील मराठा समाजाच्या वतीने लग्न समारंभ आचारसंहिता व सामाजिक बदला संदर्भात शुभेच्छुक गार्डन पाषाण येथे बैठक घेण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण ठराव समाजाच्या वतीने मांडण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मराठा समाजाच्या वतीने कै. वैष्णवी हगवणे- कस्पटे व विमान अपघातातील मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक अमोल बालवाडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, एडवोकेट पांडुरंग थोरवे, भगवान निम्हण, राहुल बालवडकर, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, नाना वाळके, लक्ष्मण पाडाळे, पुंडलिक निम्हण, संजय बालवडकर, विशाल विधाते, मधुकर निम्हण, अनिल बालवडकर, सुभाष भोळ, खंडू मांडेकर, सागर बालवडकर, नारायण सुतार, संकेत गायकवाड, महेश सुतार, किसन सुतार, संतोष धनकुडे, केदार कदम, रामदास दातार, संदिप सुतार, गणेश कामठे, मयूर उभे, करण चांदेरे, योगेश सुतार, आप्पासाहेब सुतार, गणेश मोरे, अर्चना भिवरे पाटील, रोहिदास कोकाटे, शशिकांत कोकाटे, अमोल फाले, अंकुश दगडे, मारुती सुतार, दिलीप रणपिसे, बापूसाहेब पाडाळे, नितीन रणपिसे, ज्ञानेश्वर जगदाळे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या लग्नामध्ये हुंडा अथवा गाडी देण्याचे प्रकार बंद करावे व अशा लग्नांना समाजाने जाऊ नये. वेळेचे बंधन पाळले जावे लग्न समारंभ कोरोना मध्ये ज्याप्रमाणे आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये होत होते त्याप्रमाणे दुपारी करावे व सायंकाळी सहा ते नऊ च्या दरम्यान फक्त स्वागत समारंभ आयोजित करण्यात यावे. लग्नाच्या पद्धतीतील या बदलामुळे सर्वांना भेटणे शक्य होणार आहे तसेच अन्नाची नासाडी होणार नाही. वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच उशिरा लग्न लागण्याचे प्रकार बंद होतील व समाजातील नागरिकांना ताटकळत थांबावे लागणार नाही. लग्नांना डीजे लावू नये. कर्ज काढून लग्न करू नये. लग्न वेळेवर लावण्यात यावीत. दारू पिऊन नाचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. लग्नामध्ये महागड्या वस्तूंचे प्रदर्शन करणे बंद करावे. परिसरातील मराठा समाजाची समिती तयार करण्यात यावी व त्याद्वारे प्रबोधन करण्यात यावे, तसेच महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे व महिलांचा अधिकार अधिक सहभाग सामाजिक कार्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जावे आदी ठराव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले.
माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी यासाठी सर्वांनी शपथ घेतली. तसेच पंचक्रोशी मधील गावांमध्ये मराठा समाजाच्या लग्नांमध्ये चुकीच्या प्रथा अथवा परंपरा यामुळे सामाजिक बदनामी होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा व समाजाने घेतलेल्या निर्णयांचे पालन करावे. पालन न करणाऱ्या कुटुंबांच्या विरोधात हुंडाबंदी कायदा, आर्थिक व्यवहार तपासणी, महिला आयोग तसेच अन्य कायदेशीर संस्था या मार्फत कारवाई करण्याची समितीकडून मागणी करण्यात येणार आहे.