पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाल्या नंतर पुण्यातील राजकीय समीकरणे देखील बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेत शुभेच्छा व्यक्त केल्या.
मागील निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्यामुळे पराभव पहावा लागलेल्या विजय शिवतारे यांनी बारामती मधील पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांना मात देण्यासाठी बांधणी सुरू केली होती. परंतु सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याशी जुळवून घेत शपथविधीनंतर त्यांची भेट घेत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यामुळे भविष्यात पुणे जिल्ह्यातील शिवसेना राष्ट्रवादी व भाजपा यांच्या नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष काम करून देत नसल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांची देखील स्थानिक पातळीवर मोठी अडचण झाली आहे. यातून स्थानिक कोणती नवी समीकरणे उदयास येणार याच्या चर्चा सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगताना दिसत आहेत.