महाविकास आघाडीला तख्त मिळू देणार नाही – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढवत आहोत. आख्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. एक बाजूला महायुती आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे. मात्र आम्ही इतक्या ताकदीने तयारी केली आहे की, महाविकास आघाडीला तख्त मिळू देणार नाही, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाचा निश्चय केला.

विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवाजीनगर मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ भव्य टू व्हीलर रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) चे  राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, कॅंटॉन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष मारूतीराव भापकर, रिपाइं चे शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम  आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना रामदास आठवले  म्हणाले, नरेंद्र मोदी हे नेहमीच नवनवीन लोकांना संधी देत असतात. अनेक तरुणांना या निवडणुकीत संधी मिळाली आहे. सिद्धार्थ शिरोळे हे देखील तरुण उमेदवार असून आगामी काळात त्यांना मंत्रीपद मिळू शकते. यावेळी आठवले यांनी “या निवडणुकीत भाजपच्या झेंड्यांसह फडकत आहे झेंडे निळे, मग का निवडून येणार नाही सिद्धार्थ शिरोळे”, ही कविता देखील सादर केली.

परशुराम वाडेकर म्हणाले, सिद्धार्थ या नावावरच आमच प्रेम आहे. सिद्धार्थ हा विश्वव्यापी आहे. त्यांची आम्ही पूजा करतो. तो कमळावर बसलेला आहे. तर हा सिद्धार्थ कमळाच्या चिन्हावर उभा आहे. त्याचा विजय निश्चित आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते चांगला आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. गेल्या पाचवर्षात आम्ही त्यांच्या सोबत काम केले आहे. या काळात त्यांनी कोणत्याही जाती – धर्माच्या विरोधात भूमिका घेतली नाही. त्यामुळे माणूस म्हणून शिवाजी नगर मतदार संघातील सर्व नागरिक मतदान करतील, एक लाखांच्या मताधिकयाने शिरोळे विजयी होतील असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला. 

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मागील निवडणुकीवेळी आठवले साहेब आमच्या प्रचारासाठी आले होते. अन् मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी लकी आहेत. आज पुन्हा कालचक्र फिरले असून यावेळी देखील आठवले साहेब माझ्या प्रचाराला आले आहेत. त्यांचा नक्कीच आशीर्वाद मला मिळेल.

See also  सुसगाव मधील बाळासाहेब चांदेरे यांची शासन नियुक्त समिती सदस्य (नगरसेवक )पदी निवड