पुणे वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आली ग्रासलॅन्ड सफारी

पुणे : बारामती, दौंड, इंदापूर, सासवड याठिकाणी वनक्षेत्रामध्ये वैशिष्टयपुर्ण गवताळ परिसंस्था विकसीत झाली असून याठिकाणी विपुल प्रमाणात जैवविविधता आढळून येते. या प्रदेशात वनक्षेत्रात पक्षी निरीक्षण व वन्यजीव सफारी सुरू करण्याकरीता स्थानिक ग्रामस्थ, वन्यजीव प्रेमी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने वनविभागाकडे मागणी व पाठपुरावा चालू होता. त्या अनुषंगाने वनविभागाने इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी ग्रासलॅन्ड सफारी चालू करण्यात आली. या सफारीचे बुकींग ऑनलाईन पध्दतीने www.grasslandsafari.org या वेबसाईटवर खुले करण्यात आले आहे.

पुणे वनभवन पुणे येथून मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक एन. आर. प्रविण यांचे हस्ते पुणे वनवृत्तांर्गत बारामती व इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्रातील पहिल्या ग्रासलॅन्ड सफारी करीताच्या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले. पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते तसेच सहायक वनसंरक्षक मयुर बोठे, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, पुणे वनविभाग पुणे यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी राम धोत्रे, विभागीय वन अधिकारी ए. एस. सामक, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इंदापूर व बारामती तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

वन्यप्राणी सफारीच्या माध्यमातून पर्यटक आणि वन्यजीव प्रेमी तसेच छायाचित्रणकार यांना वनक्षेत्रात माळरानावरील निसर्गसौंदर्य व वन्यजीव पर्यटन अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच बारामती व इंदापूर तालुक्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ही सफारी महत्वाची ठरणार आहे.

वन्यजीव सफारीच्या माध्यमातून वन पर्यटनाला चालना देण्याचा पुणे वनविभागाचा प्रयत्न आहे. येथील वनक्षेत्रात चिंकारा, लांडगा, तरस, ससे, कोल्हा, खोकड यासह ३०० पेक्षा जास्त माळरानावरील पक्ष्यांच्या प्रजाती देखील आढळून येतात. या ठिकाणी पर्यटक वन्यजीव फोटोग्राफीसह पक्षी निरिक्षणास देखील येत असतात. ही बाब विचारात घेत या वनक्षेत्रात येणा-या पर्यटकांना स्थानिकांच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मिळावी आणि येथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सफारी सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, यांच्याकडून सांगण्यात आले. पर्यटनाच्या दृष्टीने बारामती व इंदापूर तालुक्याला एक आगळेवेगळे स्थान निर्माण होणे करिता पक्षी निरीक्षण व वन्यजीव सफारी सुरू करणेत येत आहे. तसेच त्यामाध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपल्ब्ध करून देण्यात येणार असून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
ग्रासलॅन्ड सफारी करीताच्या वेबसाईटचे उदघाटन प्रसंगी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य, अनुज खरे, मानद वन्यजीव रक्षक पुष्कर चौबे, अशासकीय संस्था प्रतिनिधी राजीव पंडित, विनोद बारटक्के यांनी माळरानावरील परिसंस्था व वन्यजीव पर्यटन विषयक माहिती व अनुभव सांगून सफारी गाईड म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.

See also  आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे शहरात गंज पेठेत स्वच्छता अभियान