चांदणी चौकातील कामाच्या गुणवत्ता व संपूर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे – खासदार सुप्रिया सुळे

कोथरूड : पुणे शहरातील वेदभवन परिसरातील नागरिकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. तसेच चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली. उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन रस्त्याच्या संबंधित सर्व त्रुटी दूर करुण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

काही दिवसापूर्वी वेदभवन परिसरातील नागरीकांनी सुरक्षित सेवा रस्ता आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. चांदणी चौक प्रकल्पामुळे वाहतुक कोंडी सुटेल ही अपेक्षा होती. परंतु परिसरातील रहिवाशांना सेवा रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी सुरु असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरु होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इतरही अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कुणाल वेडे पाटील, किरण वेडे पाटील, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

See also  विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार - संदीप खर्डेकर