ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा-ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

पुणे : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (आस्थापना/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सचिव के.टी. पाटील, एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, पंचायत राज संचालक आनंद भंडारी, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विविध जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही. ते सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. गावातील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

पंचायत राज विभाग ग्रामीण भागाचा आत्मा असल्याचे नमूद करून श्री. महाजन म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तंत्रज्ञानामुळे कामकाजात सुलभता येत असताना शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुलभता झाली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत समाज आणि देशासाठी आपण काय योगदान देऊ शकू या भावनेने ग्रामीण माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. कार्यशाळेच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होईल आणि त्याचा फायदा ग्रामीण भागासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अभिनव कल्पना राज्यस्तरावर राबविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘उमेद’सारखी महत्वाची योजना राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. गरीब माणसाला हक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजना आहे. अशा विविध योजनांचा माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे, त्याला त्याच्या हक्कच्या मूलभूत सुविधा आणि त्याचे जीवनमान उंचाण्याचे कार्य ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मंत्री श्री.महाजन यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कामकाज सुलभीकरण, संगणकीकरण आणि विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याची भावना विकसित करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), ग्रामीण गृहनिर्माण, पंचायतराज, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, त्रिस्तरीय विकास आराखडे, विविध योजनांचे अभिसरण-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना व इतर योजनांची अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, शाळा विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकास ध्येये, पंचायत विकास निर्देशांक, पर्यावरणपुरक ग्रामीण विकास, प्रशासनातील नैतिकता व नितीमत्ता आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांचे सादरीकरणही यादरम्यान करण्यात येईल. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय बाबींसंदर्भातही कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.

See also  पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे- प्रधान सचिव प्रविण दराडे