पुणे दि.७- उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखालील जिल्हा उद्योग केंद्र पुणेतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर येथे जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद २०२४ चे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.
या कार्यक्रमात पॅनल चर्चा, सामंजस्य करारावर स्वाक्षरी आणि राज्याच्या वाढीचा मार्ग आणि गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनाचा समावेश होता. १६ हजार ५८१ कोटींची एकूण ७२ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे २९ हजार १३ रोजगार निर्माण होणार आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रदेशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्हा विकासासाठी विविध विभागांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी जिल्हा धोरण आराखड्याचे महत्त्व विशद केले. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्योग सहसंचालक श्री. राजपूत यांनी महाराष्ट्राच्या निर्यातीची परिस्थिती, उद्योगांना नियंत्रित करणारी धोरणे आणि आगामी गुंतवणूक परिषदेविषयी माहिती दिली. त्यांनी राज्याच्या निर्यात, उद्योग आणि आयटी-आयटीईएस धोरणांची रूपरेषा सांगितली.
श्री. गिरबाने यांनी प्रास्ताविकात विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी माहिती दिली. निर्यातीत अग्रेसर पाच राज्यांपैकी एक महाराष्ट्र असल्याचे सांगताना निर्यातीला चालना देण्यात पुण्याच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात एनझेडयुआरआय पुणे नॉलेज पार्क प्रायव्हेट लिमिटेड आणि जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध क्षेत्रांमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीसाठी ७२ गुंतवणूकदार आणि जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
कॉपर क्लाउड, ऑटो-क्लस्टर्स आणि आयव्हीआय अल्फा प्रा. लि. यासह स्थानिक व्यवसायांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली.
मैत्री विभागातील उमेश पाटील यांनी व्यवसाय सुलभ करण्यासाठी मैत्री सेलची भूमिका विशद केली. परराष्ट्र व्यापाराचे संयुक्त महासंचालक वरुण सिंग यांनी डीजीएफटीने व्यापाराला चालना देण्यासाठी ऑफर केलेल्या योजनांवर प्रकाश टाकला.
फूड प्रोसेसिंग, डिफेन्स आणि आयटी, आयटीईएस यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये पॅनेल चर्चा झाली. या चर्चेत रोहन उर्सल, हर्ष गुणे, दिनानाथ खोलकर आणि आदित्य परांजपे आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या क्षेत्रांमधील व्यवसाय धोरणे, तांत्रिक प्रगती आणि आयात प्रतिस्थापन यावर चर्चा झाली.
या कार्यक्रमाने भागधारकांना नेटवर्क, विचारांची देवाणघेवाण आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.