पुणे: पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे (एमआयटी एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हेरिटेज यात्रा-२०२५” या तीन दिवसीय सांस्कृतीक वारसा उत्सवाला दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानात सकाळपासूनच पुण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कलाग्रामला भेट देण्यास सुरुवात केली. लोणी काळभोर येथील विश्वशांती गुरुकुल स्कूल, सिंहगड स्प्रिंग डे, आणि बिबवेवाडी येथील विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सकाळीच हजेरी लावली आणि दिवसभर विद्यार्थ्यांची संख्या वाढतच राहिली.
गुरुवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पृथ्वीराज बी.पी., एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु. कराड यांच्या हस्ते या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘एमआयटी एडीटी’चे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डाॅ.अश्विनी पेठे, सिंहगड वार्ड कार्यालयाचे सहायक आयुक्त नामदेव बाजबळकर, कोंढवा वॉर्ड कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश कदबाने, शिवाजीनगर आयुक्तलयाचे सहायक आयुक्त गोविंद दांगट, सुनील मोहिते (वारसा विभाग पीएमसी), रोहिदास गव्हाणे (प्रभारी अधीक्षक अभियंता, भवन रचना विभाग पीएमसी), युवराज देशमुख (मुख्य अभियंता, प्रकल्प), राजेश कामठे (प्रशासकीय प्रमुख, सांस्कृतिक विभाग) उपस्थित होते.
“हेरिटेज यात्रा-२०२५”साठी कलाग्रामची रचनाच वारसास्थळाप्रमाणे करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर उभारलेली भव्य अयोध्या मंदिराची प्रतिकृती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, जी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. या वारसा यात्रेतील कार्यशाळा हे लहान मुले आणि अभ्यागतांसाठी खास आकर्षण ठरले आहेत. यात्रेत प्रवेश करताच नैसर्गिक काष्ठ शिल्प, कुंभार प्रदर्शन आणि पारंपरिक भारतीय वास्तू ज्ञान प्रणालीचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
मुलांसाठी तयार करण्यात आलेला ‘वारसा खेळभूमी’ (Heritage Playland) हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांना वारसा खेळ खेळण्याची प्रचंड उत्सुकता दिसत होती. यात वारसा आधारित शब्दकोडे, भारताच्या भाषा, राजधान्या, भारतातील युनेस्कोची वारसा स्थळे, स्मारके इत्यादींवर आधारित कार्यपत्रकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारायला आवडतात आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येत आहे. सिंहगड स्प्रिंग डेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सांगितले की, “शब्दकोडे सोडवल्याने आम्हाला विचार करण्याची क्षमता मिळते आणि ती वारसा स्थळे व भारतीय वारसावर आधारित असल्याने आमची ज्ञानात्मक क्षमता विकसित झाली.”
‘महामिस्ट्री पझल’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आधारित जिग्सॉ पझल ॲक्टिव्हिटी आहे. ‘अराउंड इंडिया’ आणि ‘डार्ट अँड डिस्कव्हर’ हे खेळ मुलांसाठी मजेदार आणि आव्हानात्मक ठरले. ‘मिस्ट्री बॉक्स चॅलेंज’ या आणखी एका ॲक्टिव्हिटीने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, “मिस्ट्री बॉक्स खेळायला खूप मजा आली. यात १० विविध स्तर आहेत, जे आव्हानात्मक आणि मनोरंजक आहेत. या खेळातून आम्हाला विविध ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांची माहिती मिळाली.”
वारली कार्यशाळेलाही उदंड प्रतिसाद
वारली चित्रकला आणि टाई अँड डाय यांसारख्या कार्यशाळांनाही मुले आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, या प्रत्यक्ष कृतीतून त्यांना या ॲक्टिव्हिटीज मागील संकल्पना समजून घेण्यास मदत झाली. टाई अँड डाय आणि वारली पेंटिंगसारख्या कार्यशाळांमधून जाताना, आपल्या कलाकृतीचे अंतिम स्वरूप पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.