पुणे : गेल्या दहा वर्षात देशाची सत्ता चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी सरकार जाणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.
पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
कोळसे पाटील म्हणाले, संविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालय, संसद नंतर आहे. निवडणुक आयोग, न्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रीया बदलली. मोदी शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले. निवडणुक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सितारामन् यांचे पती म्हणत आहेत. मुलभुत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वत:हून अॅक्शन घेते. मात्र, देशात मुलभुत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी जाणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव दिसत आहे. झोला घेवून जाता येणार नाही, त्यापूर्वी त्यांना केलेल्या ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल. त्यानंतर त्यांनी कुठे जायचे तिकडे जावे, असेही कोळसे पाटील म्हणाले.
मोदींसारखा खोटं बोलणारा नेता यापूर्वी कधी देशाने पाहिला नाही. नोटबंदीनंतर काळा पैसा देशात आला का ? खोटं बोलून लाचारांची फौज पुढे बसवून हसायला लावणारे मोदी आहेत. धमकी देवून धंदा व चंदा गोळा केला. दहाते लाख लोक देश सोडून परदेशात स्थायीक झाले. देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या वाटेने चालत असून त्यांना देशाची चिंता आहे. वसंतदादा व इतर लोक कमी शिकलेले होते, तरीही त्यांनी संसद गाजवली. तशाच प्रकारे रविंद्र धंगेकर संसद गाजवतील, असेही कोळसे पाटील म्हणाले.
घर ताज्या बातम्या मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा -माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील