संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ” नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे.  नरेंद्र मोदी यांना या देशांमध्ये संपूर्णतः हुकूमशाही आणावयाची असल्याने भारतीय संविधान त्यांना अडसर ठरत आहे , त्यामुळेच भारताचे संपूर्ण संविधान बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. संविधान बदलासाठी ते 400 पार चा नारा देत आहे परंतु या देशातील जनतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर नितांत प्रेम असल्याने या निवडणुकांमध्ये संविधान बदलाचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा निश्चित पराभव होईल. ” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

34 पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या संविधान सन्मान रथा चे उद्घाटन आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे  यांनी ” भाजपा नेत्यांकडून संविधान बदलाच्या सातत्याने होणाऱ्या विधानांमुळे आंबेडकरी जनतेत चीड निर्माण झाली आहे. सध्या आंबेडकरी  जनमत हे संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला अनुकूल असून कोणत्याही स्वरूपामध्ये मत विभागणी न होता रवींद्र धंगेकर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल अशी ग्वाही दिली.”

सदर वेळी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील , पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे , प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी ,रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे शैलेंद्र मोरे,  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मिलिंद आहिरे, रिपाईचे अशोक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर