पुणे : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून त्यासाठीचा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात छायाचित्र समान नोंदी, भौगोलिकदृष्ट्या समान नोंदी घेणे आणि अर्ज प्रलंबित असल्याने भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.
पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याच्या सध्याची तारीख २६ डिसेंबर २०२३ ऐवजी १२ जानेवारी २०२४, मतदार यादीचे मानांकन तपासणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, अभिलेख अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची तारीख १ जानेवारी २०२४ ऐवजी १७ जानेवारी २०२४ आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी ऐवजी २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे.
*राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक*
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमती कळसकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी तहसिलदार शितल मुळे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.