बाणेर : बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे खूप त्रास होत आहे तसेच पुणे विद्यापीठ चौकापासून हायवे पर्यंत वाहतूक कोंडीचे मोठे प्रश्न रोज उद्भवत आहेत या प्रश्नांची मला जाणीव असून, बाणेर बालेवाडी भागातील सर्व सोसायट्यांना व नागरिकांना पुरेशा व समान दाबाने पाणी पुरवठा करण्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मी तातडीने सोडवणार आहे.
तसेच वाहतुकी संदर्भातही नागरिकांचा सहभाग घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावेन, किंबहुना खासदार म्हणून निवडून आल्यावर सर्वात पहिले हे प्रश्न सोडविणार असे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. बाणेर – बालेवाडी भागातील असंख्य सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न असून, वाहतूक कोंडीचेही मोठे प्रश्न आहेत त्या संदर्भात तेथील विविध सोसायट्यांमधील पदाधिकारी व नागरिकांनी आ. रवींद्र धंगेकर यांची भेट घेऊन पाण्याचा व वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘आपण स्वतः प्रयत्न केला तरच हा प्रश्न सुटेल’ असा आग्रह धरला त्यावेळी आमदार रवींद्र धंगेकर बोलत होते.
या प्रसंगी जीवन चाकणकर, नाना वाळके, रुपेश बालवडकर, संदीप बालवडकर, रोहित झेंडे, बाळासाहेब मुरकुटे, जयेश मुरकुटे आदी उपस्थित होते.