मांजरी परिसरातील विविध समस्यांबाबत निवेदन

मांजरी : मौजे मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द येथील मुळा मुठा नदीवरील पूल बांधण्याचे काम गेले कित्येक वर्ष संथ गतीने चालू आहे. सदर ठिकाणी नदीपात्रामध्ये ठेकेदाराने बंधारा घालून पाणी अडवले आहे. पर्यायाने पुण्यातून आलेली जलपर्णी येथील संपूर्ण नदीपात्रामध्ये भरगच्च भरलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झालेली आहे.

मांजरी बुद्रुक मधील मांजरा नगर झोपडपट्टी, गावठाण तसेच मांजरी खुर्द मधील नदीकिनारी असणाऱ्या हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. डेंगू, मलेरिया सारखे आजार येथील नागरिकांना झालेले आहेत. या सर्व गोष्टीस सार्वजनिक बांधकाम खात्याकडील संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. गेली तीन ते चार वर्षे झाली या पुलाचे काम रखडलेले आहे.‌ सध्या पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झालेले आहे.. परंतु ठेकेदाराने पाणी अडवण्यासाठी घातलेला बंधारा अद्यापही काढलेला नाही. पर्यायाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना मच्छरांचा खूपच त्रास होत आहे. या अगोदर तक्रारी करूनही पुणे मनपाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सबक सदर गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन पुणे मनपाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संबंधित ठेकेदारावर हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आणले या गुन्ह्याखाली गुन्हा नोंद करून ,नदीवरील संबंधित ठिकाणचा बंधारा त्वरित काढून टाकावा. तसेच संपूर्ण जलपर्णी काढण्यात यावी.

तसेच नदीकिनारी असणाऱ्या मांजराईनगर झोपडपट्टीमध्ये औषध फवारणी करावी. अन्यथा दिनांक १५/०१/२०२४ सोमवारी दुपारी चार वाजता मांजरी बुद्रुक मधील मुळा मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे 100 पुरुष व 100 महिला यांच्या समवेत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.

याबाबत अमोल पवार, कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग सार्वजनिक बांधकाम खाते पुणे यांना आम आदमी पार्टी राजेंद्र साळवे, गौतम भोसले माजी उपसरपंच मांजरी खुर्द, राजेंद्र भोसले यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

See also  शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार