पुणे : गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आणि पुणेकरांची दिशाभूल करणारा वाटतो. आपण स्वतः प्रशासनासह नाल्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहाणी करावी, अशी मागणी भाजपा राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत केली.
शहर आणि उपनगरातील नाले सफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांची मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत 90 टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच प्रशासनाने केला. परंतु शहरात मागील आठवड्याभरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने पुणेकरांची गैरसोय होत आहे. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाजे व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत कमी वेळात ढगफुटी सदृश्य अधिक पाऊस होत आहे. पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. शहरात पाचशे किलोमीटर लांबीचे छोटे-मोठे ओढे आणि नाले आहेत. या नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही.
यावेळी श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.