वृक्षारोपण संकल्पाची यशस्वी सुरुवात पहिल्या टप्प्यात कोथरुड मध्ये ६५०० वृक्षांची लागवड

पुणे : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या १० जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि राज्याबाहेरुन देखील सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, नामदार पाटील यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या संकल्पाची यशस्वी सुरुवात झाली आहे.. कोथरुड मध्ये पहिल्या टप्प्यात ६५०० वृक्ष लागवड करुन त्याच्या संवर्धनाचे नियोजन करण्यात आले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री आणि सोलापूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या १० जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन, दूरध्वनी करुन अभिष्टचिंतन केले.

दरम्यान, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ६५ हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प त्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे.. या संकल्पा अंतर्गत वृक्षतोडीमुळे उजाड झालेल्या  टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात महत्वाचे ठरणारे वड, चिंच, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, बेल, अर्जून, शिवण, बहावा, बकुळ, कदंब, करंज, करमळ, बेहडा, हिरडा,  कांचन, आपटा, शेंद्री, वारस, काळाखुडा, मेहंदी, पांगारा, भोकर, धामण, महारुख, मोह, बिबा, दातरंग, खैर, तिसळ, खरोटी, नाना, उंबर यांसह विविध दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

या संकल्पाचा शुभारंभ दिनांक ९ जून रोजी कोथरुड मधील म्हातोबा आणि महात्मा टेकडी आणि पाषाण तलाव परिसरात वृक्ष लागवडीने करण्यात आली. तर १० जून रोजी कसब्यातील वर्तक उद्यान येथेही वृक्ष लागवड आणि रोपांचे वाटप करण्यात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये ५५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. कोल्हापूर मध्ये दिनांक ११ जून रोजी शेंडा पार्क येथे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर सोलापूर मध्ये १५ जून पासून हा संकल्प कार्यवाहीत येणार आहे.

या संकल्पाबाबत बोलताना नामदार पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणी मानवी आक्रमणामुळे वृक्षतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी तसेच वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे, वृक्ष संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

See also  योगीराज पतसंस्थेला 9 देशांच्या 10 प्रतिनिधींची भेट